मुंबई : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाभारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत दिग्गज गोलंदाज कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी सहज जिंकली. कसोटी मालिकेत पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली. आशिया चषक स्पर्धेत वन डे संघात दणक्यात पुनरागमन करणाऱ्या जडेजानेही कसोटी मालिकेत उल्लेखनीय खेळ केला.
विंडीजविरुद्धच्या वन डे सामन्यात जडेजाला विक्रमाची नोंद करण्याची संधी आहे. विंडीजविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत जडेजाला 15 विकेट घेण्याची आवश्यकता आहे. त्याने यात यश मिळवले, तर विंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा मान त्याला मिळेल. हा विक्रम सध्या कपिल देव यांच्या नावावर आहे. त्यांनी विंडीजविरुद्ध 42 वन डे सामन्यात 3.62 च्या सरासरीने 43 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर या विक्रमात अनिल कुंबळे ( 41 विकेट), हरभजन सिंग ( 33) यांचा क्रमांक येतो. विंडीजविरुद्ध जडेजाने 19 सामन्यांत 29 विकेट घेतल्या आहेत.
आशिया चषक स्पर्धेत जडेजाने 4 सामन्यांत 7 विकेट घेतल्या होत्या. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्घच्या कसोटी मालिकेतही त्याने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याला वन डे मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आली आहे.