Virat Kohli Rohit Sharma, IND vs WI: भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच टी-२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार असून त्यातील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. गेल्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता भारतीय संघाला त्या कटू आठवणी विसरून WTC च्या नव्या वर्तुळाची जोरदार सुरुवात करायची आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्याकडे दमदार विक्रम करण्याची संधी आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत वरचढ
कसोटी सामन्यांनंतर होणारी एकदिवसीय मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एकदिवसीय विश्वचषक देखील यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला वन डे मालिकेद्वारे आपली रंगीत तालीम करता येईल. वेस्ट इंडिजची अलीकडची कामगिरी तितकीशी खास राहिली नाही. वेस्ट इंडिजचा संघ २०२३ च्या वन डे विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही, त्यामुळे त्याचे मनोबल खूप खचले आहे. नेदरलँड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडसारख्या संघांविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध विक्रमी कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. कसोटी आणि वन डे मालिकेदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
किंग कोहलीला 102 धावा करण्याची गरज
एकदिवसीय मालिकेदरम्यान विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. कोहलीने 102 धावा केल्या तर तो वनडेत 13 हजार धावा पूर्ण करेल. आतापर्यंत केवळ चार फलंदाजांना ही कामगिरी करता आली आहे. कोहलीने 274 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत ज्यात 46 शतके आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित दोन खास विक्रम करू शकतो
भारतीय कर्णधार रोहित शर्माही वनडेत १० हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत १७५ धावा केल्या तर तो १० हजार धावांचा आकडा गाठेल. रोहितने आतापर्यंत 243 सामन्यांत 48.63 च्या सरासरीने 9825 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 30 शतके आणि 48 अर्धशतके झळकावली आहेत.
Web Title: IND vs WI Rohit Sharma and Virat Kohli have a chance to make two big records on the tour of West Indies for Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.