IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवण्यात आले. भारतीय संघ १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंडीज मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे आणि या मालिकेपासून भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ स्पर्धेचा प्रवासही सुरू होणार आहे. पुजाराला वगळून बीसीसीआयने भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच पाऊलं उचलायला सुरूवात केली आहेत. पण, ज्या प्रकारे यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान साहा याला संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट संदेश दिला गेला होता, तसाच पुजारालाही दिला गेल्याचे वृत्त आहे.
चेतेश्वर पुजाराला बाहेर काढलं, पण नंबर ३ साठी पाच खेळाडूंमध्ये शर्यत लागली!
दुलिप करंडक स्पर्धेत साहाने खेळण्यास नकार दिला, कारण भारतीय संघात निवडच होणार नसेल तर युवा खेळाडूची जागा कशाला अडवू असे स्पष्ट मत साहाने व्यक्त केले होते. तशीच परिस्थिती आता पुजारावर येतेय की काय, अशी चिंता चाहत्यांना सतावतेय. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या कसोटी संघात पुजाराला बळीचा बकरा केला गेला असे स्पष्ट मत महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार भारताच्या संघ व्यवस्थापनाने याबाबत पुजाराशी चर्चा केली आणि त्यानंतरच त्याला कसोटी संघात न घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
पण, त्याच्यासोबत नेमकं कोण बोललं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साहाला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने यापुढे तुझा कसोटी संघासाठी विचार केला जाणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे याहीवेळेस पुजारासोबत द्रविड किंवा अन्य कोणी बोललं, याची माहिती मिळालेली नाही. पुजाराने भारताकडून १०३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळेच आता युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे व्यवस्थापनाचे मत आहे. पुजारा दुलिप ट्रॉफीत खेळेल का, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
पुजाराला मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. WTC मधील १७ कसोटी सामन्यांत त्याने ३२च्या सरासरीनेच धावा केल्या आहेत. पुजाराच्या नावावर १०३ कसोटीत ४३.६०च्या सरासरीने ७१९५ धावा आहेत, ज्यात १९ शतकं व ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.
Web Title: IND vs WI Series : Cheteshwar Pujara has been informed that new players will be given an opportunity.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.