IND vs WI Series : वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये सारं काही आलबेल नक्कीच नाही... दोन वेळच्या वन डे वर्ल्ड कप विजेत्यांना भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित करता आली नाही. त्यात आता त्यांना तगड्या भारतीय संघाचा सामना करायचा आहे. १२ जुलैपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्या २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करता न आल्याने खेळाडूंचे मनोबल खचलेलं आहे आणि तेच उंचावण्यासाठी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा ( Brain Lara) मैदानावर उतरला आहे. ४८ वर्षांत प्रथमच वेस्ट इंडिज वन डे वर्ल्ड कप खेळणार नाही.
१२ जुलैपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. माजी फलंदाज लारा या मालिकेसाठी विंडीजच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कॅरेबियन संघासोबत तो मेंटॉर म्हणून जॉईन झाला आहे. लाराचा अनुभव संघाची कामगिरी उंचावण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा आहे.
ब्रायन लाराने १३१ कसोटी व २९९ वन डे सामन्यांत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने ५२.८८ च्या सरासरीने ११९५३ धावा केल्या आहेत. त्यात ३४ शतकं व ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. ४०० ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. वन डे क्रिकेटमध्ये लाराने १९ शतकं व ६३ अर्धशतकांसह ४०.४८च्या सरासरीने १०४०५ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), अॅलिक अॅथनाझे, जेर्मेन ब्लॅकवूड, एनक्रुमाह बोन्नेर, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशुआ डा सिल्वा, शेनॉन गॅब्रिएल, कावेम हॉज, अकिम जॉर्डन, जैर मॅकएलिस्टर, किर्क मॅकेंझी, मार्क्यूनो मिंड्ली, अँडरसन फिलिप, रेयमन रैफर, केमार रोच, जेडेन सिल्स, जोमेल वॉरिकन.