IND vs WI Series : भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने कसोटी व वन डे संघ जाहीर केले अन् वादाला तोंड फुटले... WTC Final मधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर अनेक दिग्गज फलंदाजांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता होती, परंतु कुऱ्हाड केवळ चेतेश्वर पुजारावर पडली... रोहित शर्मा, विराट कोहली यांनी स्थान कायम राखले. एक महिना आराम मिळूनही मोहम्मद शमीला या दौऱ्यासाठी पुन्हा विश्रांती दिली गेली. ऋतुराज गायकवाड व मुकेश कुमार यांची दोन्ही संघात निवड झाली, तर यशस्वी जैस्वालला कसोटीत संधी मिळाली. पण, त्याचवेळी रणजी करंडक स्पर्धेचे मागील तीन हंगाम गाजवणाऱ्या सर्फराज खानसह, प्रियांक पांचाळ व अभिमन्यु इश्वरण यांना नजरअंदाज केल्याने वाद पेटला आहे.
भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुजाराला बळीचा बकरा बनवल्याचा दावा करताना सर्फराजवरून BCCIला खडेबोल सुनालवले आहेत. ते म्हणाले की, ''देशांतर्गत क्रिकेटमधील या फलंदाजाची कामगिरी ओळखायला हवी होती. सर्फराज गेल्या तीन हंगामात १००च्या वर सरासरीने धावा करत आहे. संघात निवड होण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा जरी झाली नाही तरी त्याला संघात घेता येईल.''
आता भारताचा माजी सलामीवीर आणि रणजी करंडक स्पर्धा गाजवणारा वासीम जाफर ( Wasim Jaffer ) यानेही बीसीसीआयला तीन प्रश्न विचारले आहेत.
१) चार सलामीवीर निवडण्याची गरजच काय? त्याएवजी देशांतर्गत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानची मधल्या फळीसाठी निवड करता आली असती.२) इश्वरण आणि पांचाळ यांनी रणजी करंडक व भारत अ संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ते बऱ्याच कालावधीपासून भारताच्या कसोटी संघाचे दार ठोठावत आहेत. ते फक्त आयपीएल खेळत नाहीत म्हणून त्यांना बाजूला केलं गेलं आहे का? ऋतुराज गायकवाड मध्येच कुठून आला?३) एक महिन्यांची विश्रांती मिळाली असूनही मोहम्मद शमीला विश्रांती दिल्याचे आश्चर्य वाटतेय. त्याला जेवढी संधी दिली जाईल, तेवढी त्याच्या गोलंदाजीची धार तीव्र होईल, असे मला वाटते.