India vs West Indies Series : वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडला पराभूत करून आता भारत दौऱ्यावर येणार आहे. मायदेशात झालेल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत वेस्ट इंडिजनं ३-२ असा विजय मिळवला. या मालिकेत विंडीजच्या युवा फळीनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वास वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यानं व्यक्त केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अकिल होसैन, रोमारियो शेफर्ड, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन व जेसन होल्डर यांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. यांच्याकडून भारत दौऱ्यावरही अशाच कामगिरीची पोलार्डला अपेक्षा आहे. तो म्हणाला,''आमच्याकडे चांगले वन डे क्रिकेटपटू आहेत. त्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत काही युवा खेळाडूंनी त्यांचा दम दाखवला आहे. भारतातही ते असाच खेळ करतील याची मला खात्री आहे.''
''इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय खास आहे. आता भारत दौऱ्यावर सकारात्मक निकालासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,'' असे मत पोलार्डनं व्यक्त केले. पोलार्ड व रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.. IPL 2022साली मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १२ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी) व किरॉन पोलार्ड ( ६ कोटी) यांना संघात कायम राखले आहे. आयपीएल २०२० पूर्वी पोलार्ड व रोहित आपापल्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.
वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), निकोलस पूरन ( उपकर्णधार), फॅबियन अॅलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कोट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शे होप, अकिल होसैन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, रोमारीयो शेफर्ड, ओदीन स्मिथ, कायले मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर
वेस्ट इंडिजचा वन डे संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), फॅबियन एलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार्ह ब्रुक्स, जेसन होल्डर, शे होप, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारिओ शेफर्ड, ओदीन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेतील तीन वन डे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील.