कोलकाता : भारताविरुद्ध टी-२० मालिका ०-३ ने गमाविणाऱ्या वेस्ट इंडिजने वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आमच्या खेळाडूंनी झुंजारवृत्तीचा परिचय दिला,’ अशी प्रतिक्रिया कर्णधार किरोन पोलार्ड याने दिली.
‘ माझ्या मते खेळाडूंनी अपमानास्पद पराभव असल्याचे मनात आणू नये. आम्ही पराभवावर समाधानी नाही. प्रत्येक सामना जिंकण्याच्या इराद्यानेच प्रयत्न केले. रोवमॅन पॉवेल आणि निकोलस पूरन यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर आम्ही दुसरा सामना जिंकण्याच्या स्थितीत होतो. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीच्या बळावर भारताने आठ धावांनी बाजी मारली. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जय - पराजय यामध्ये किती सूक्ष्म रेषा असते याची जाणीव झाली. गोलंदाजी आणि फलंदाजीत चुका करण्यास वाव नसतो याची खात्री पटली.’
अखेरच्या षटकात दमदार कामगिरी करण्यावर आम्ही भर देत आहोत. सुरुवातीच्या १५ षटकांत अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात यश आले आहे. विंडीजसाठी सकारात्मक बाब म्हणजे निकोलस पूरनचा फॉर्म. पूरनने तीन अर्धशतके ठोकली. त्याच्या १८४ धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या, असे पोलार्डने सांगितले. ‘माझ्या मते ही चांगली मालिका होती. खेळाडूृंनी जबाबदारी स्वीकारून खेळ केला. सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यास थोडा वेळ लागेल,’ असेही पोलार्ड म्हणाला.