Join us

IND vs WI Series : सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वोत्तम सरासरी असलेला मुंबईचा फलंदाज पुन्हा दुर्लक्षित!  

IND vs WI Series : BCCI भारतीय संघाची भविष्याची वाटचाल ठरवताना संघात युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:31 IST

Open in App

IND vs WI Series : BCCI भारतीय संघाची भविष्याची वाटचाल ठरवताना संघात युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. BCCI शुक्रवारी वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड या स्थानिक व आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंसह मुकेश कुमार, नवदीप सैनी यांची कसोटी संघात संधी दिली गेली आहे. पण, त्याचवेळी मुंबईकर सर्फराज खान ( Sarfaraz Khan) याला पुन्हा एकदा डावलल्याने नाराजीचा सूर उमटतोय.

रिक्षा चालकाच्या मुलाची भारताच्या वन डे व कसोटी संघात निवड; प्रेरणादायी आहे त्याचा प्रवास

१५ महिन्यांपूर्वी ज्या अजिंक्य रहाणेला कसोटी संघातून काढले. त्याला सेंट्रल करारातूनही वगळले गेले, त्यानंतर त्याने WTC Final मधून पुनरागमन करताना भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. आता त्याची कसोटी संघाच्या उप कर्णधारपदी पुन्हा निवड झाली आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, उमेश यादव या सीनियर खेळाडूंना वगळण्यात आले आहे. केएस भरतला पुन्हा यष्टींमागे संधी दिली गेलीय अन् त्याला राखीव म्हणून इशान किशन संघात आहेच. त्याचवेळी स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या सर्फराज खानला संधी का नाही, असा सवाल केला जातोय.  

IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

रणजी ट्रॉफीच्या मागील ३ मोसमात सर्फराज खान इतक्या धावा दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाने केल्या नाहीत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने खळबळ माजवणाऱ्या सर्फराजची बऱ्याच दिवसांपासून संघात चर्चा होत होती. मात्र आतापर्यंत या खेळाडूची एकदाही भारतीय संघात निवड झालेली नाही. सर्फराजने आपल्या कारकिर्दीत ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५०५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७९.६५ आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वाधिक सरासरी ही सर्फराजची आहे. त्याने रणजी करंडक स्पर्धेच्या सलग दोन पर्वात ९००+ धावा केल्या आहेत. असे असूनही निवड समिती त्याला संधी देताना दिसत नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमुंबईरणजी करंडक
Open in App