India vs West Indies Series : इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकून आता वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ६ फेब्रुवारीपासून भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies) यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात होईल आणि त्यानंतर कोलकातात ट्वेंटी-२० मालिका पार पडेल. भारतीय संघ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली या मालिकेत मैदानावर उतरणार आहे आणि माजी कर्णधार विराट कोहली हिटमॅनच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. विराटनं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वाच्या बदलासह टीम इंडियात आणखीनही काही बदल पाहायला मिळणार आहेत. त्यात भारतीय संघात दोन नव्या खेळाडूंची stand-by players ( राखीव) म्हणून निवड झाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेतील तीन वन डे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. या मालिकेसाठी भारतीय संघात तामिळनाडूच शाहरूख खान आणि साई किशोर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.
''वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी शाहरूख खान व साई किशोर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. ते लवकरच टीम इंडियासाठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये दाखल होतील. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना ते मुकणार आहेत,''अशी माहिती तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी ANI ला दिली.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या शाहरूख खाननं हवा केली होती. त्याची स्फोटक फटकेबाजीही मंत्रमुग्ध करणारी आहे. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दीनेश कार्तिक यानंही शाहरूख भविष्यात भारतीय संघात दिसेल, असे म्हटले होते. ''भारतीय संघाच्या प्रवेशद्वाराजवळ शाहरूख खान उभा आहे. त्याला संधी मिळाल्याचे मला आश्चर्य अजिबात वाटणार नाही. भारतीय संघासाठी तो दमदार कामगिरी करेल,''असे मत कार्तिकनं व्यक्त केले.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
भारताचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज , भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल
राखीव खेळाडू - शाहरूख खान, साई किशोर
Web Title: IND vs WI Series : Shahrukh Khan, R Sai Kishore added to India's stand-bys for West Indies series, to miss initial phase of Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.