IND vs WI Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी व वन डे संघ जाहीर केला. ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, मुकेश कुमार, यशस्वी जैस्वाल हे युवा खेळाडू या संघांत दिसत आहेत. त्याचवेळी उमेश यादव व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर केले गेले आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. उमेश यादव व चेतेश्वर पुजारा यांचे परतीचे दोर कापले गेल्याची चर्चा असताना BCCI ने मोठे अपडेट्स दिले आहेत. त्याचवेळी विंडीज दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेसाठी आयपीएल २०२३ गाजवणारा युवा फलंदाज पदार्पणासाठी सज्ज असल्याचीही माहिती मिळतेय.
अनुभवी गोलंदाज उमेश यादव याला विंडीज दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलेले नाही, तर मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्याला विश्रांती दिली गेल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. ''उमेश यादवला हॅमस्ट्रींग दुखापत झाली आणि तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी TOI ला सांगितले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ३५ वर्षीय गोलंदाजाला साजेशी कामगिरी ( ०-७७ व २-५४) करता न आल्याने त्याला वगळल्याची चर्चा होती. ५७ कसोटींत १७० विकेट्स घेणाऱ्या उमेशसाठी कसोटीचे दरवाजे बंद झालेले नाहीत. चेतेश्वर पुजारासाठीही परतीचा मार्ग असल्याचे सांगण्यात आलेय.
''१५ महिन्यांपूर्वी कसोटी संघातून डावललेला अजिंक्य रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून पुनरागमन करू शकतो आणि त्याला विंडीज मालिकेत उप कर्णधार बनवले जाऊ शकते, मग कुणीही पुनरागमन करू शकेल. कोणत्याही सीनियर खेळाडूंसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत,''असेही सूत्राने सांगितले.
रिंकू सिंगचे ट्वेंटी-२० संघात पदार्पण?
कोलकाता नाईट रायडर्सच्या या फलंदाजाने आयपीएल २०२३ गाजवली. त्याने १४ सामन्यांत ५९.२५च्या सरासरीने आणि १४९.५२ च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा कुटल्या. त्याच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्याला विंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले जाऊ शकते. मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० मालिकेतही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.