हैदराबाद : पृथ्वी शॉ पाठोपाठ मुंबईच्या शार्दुल ठाकूरने भारताच्या कसोटी संघात अखेर पदार्पण केले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या शार्दुल कसोटीत पदार्पण करणारा २९४ वा खेळाडू आहे.
त्याच्या प्रवेशासाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. २०१६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर शार्दूलला भारताच्या कसोटी संघात समाविष्ट केले होते, परंतु त्याला अंतिम संघात आज संधी मिळाली.
२६ वर्षीय शार्दूलने २०१२ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. त्याने ५५ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत २८.२७ च्या सरासरीने धावा देताना १८८ विकेट घेतल्या. पालघरच्या या खेळाडूने भारताक ५ वन डे आणि ७ ट्वेंटी-२० सामन्यांत मिळून १४ विकेट घेतल्या आहेत.
२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. तर हनुमा विहारी आणि पृथ्वी याच्यानंतर सलग तिसरा कसोटी पदार्पणवीर ठरला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅप देण्यात आली.