भारतीय संघाने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकाही खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाने मालिका जिंकली असली तरी, दुसऱ्या सामन्यात केलेल्या एका नव्या प्रयोगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
सुनील गावस्कर यांची टीका
भारताचा सलामीवीर शिखर धवन कोरोनामुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच, इशान किशनही संघाचा भाग नव्हता. अशा स्थितीत रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीची जोडी बदलली. रोहितने स्वतःसोबत ऋषभ पंतला सलामीला उतरवले. यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनाही ही नवी जोडी फारशी आवडली नाही.
रोहित-पंत जोडी आवडली नाही
सामन्यानंतर टीव्ही चॅनलशी बोलताना गावस्कर म्हणाले, 'संघात रोहित आणि पंतचा सलामीवीर म्हणून समावेश करणे योग्य निर्णय नव्हता. या दोघांना सलामीला पाठवणे हा शेवटचा पर्याय असू शकतो. मी असतो तर, शेवटचा पर्याय म्हणून या दोघांना सलामीला फलंदाजी दिली असती. शिखर धवन नसताना केएल राहुलला रोहितसोबत सलामीला पाठवायला हवे होते. याशिवाय, इशान किशनदेखील सलामीला फलंदाजी करू शकतो.
गावस्कर यांना गायकवाड यांना संघात पाहायचे आहे
यावेळी गावस्कर ऋतुराज गायकवाड यालाही संधी देण्याबाबत बोलले. गावस्कर म्हणाले, 'कोरोनातून ठीक झाल्यावर ऋतुराज गायकवाड यालाही सलामीला संधी देता येईल. ऋतुराज उत्तम फलंदाज असून, तो टॉप ऑर्डरमध्ये चांगले योगदान देऊ शकतो. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात आपण त्याला सातत्याने सलामीला धावा करताना पाहिले आहे. तो ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तोही सलामीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे गावस्कर म्हणाले.
ऋषभ पंत सलामीला अपयशी
संघात ऋषभ पंत मधल्या फळीत फलंदाजी करतो. पण, त्याला काल झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला येण्याची संधी देण्यात आली होती. सलामीला आल्यानंतरही पंत आक्रमकपणे खेळू शकला नाही. हा नवीन प्रयोग फेल ठरला. सलामीला आलेल्या पंतने 34 चेंडूत 18 अवघ्या धावा करून माघारी परतला. यामुळेच सुनील गावस्कर या निर्णयावर नाराज झाले.
Web Title: IND vs WI: Sunil Gavaskar doesn't like Rohit Sharma and Rishabh Pant opening pair
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.