ंIndia vs West Indies 1st ODI : भारतीय संघाने वन डे मालिकेची सुरुवात दणक्यात केली. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ११४ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने २२.५ षटकांत ५ विकेट्स राखून विजय मिळवला. कुलदीप यादव ( ४-६), रवींद्र जडेजा ( ३-३७) आणि इशान किशन ( ५२) हे या विजयाचे शिल्पकार ठरले. पण, या सामन्यात सूर्यकुमार यादव चर्चेत राहिला, कारण त्याने संजू सॅमसनची जर्सी घालून संपूर्ण सामना खेळला. संजूला वन डे मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु कर्णधार रोहित शर्माने इशानवर विश्वास दाखवला. पण, सूर्यकुमार संजू सॅमसनची जर्सी घालून मैदानावर उतरल्याने पाहणाऱ्यांचा गोंधळ उडाला. काहींनी हे संजूसोबत असलेल्या मैत्रीमुळे सूर्याने केल्याचा दावा केला, परंतु खरं कारण समोर आलं आहे. सूर्यकुमारला मजबुरीमुळे ही जर्सी घालावी लागली आहे.
जर्सीच्या साईजमुळे हा गोंधळ उडाला. सुर्यकुमारच्या मापाची जर्सी वेळेल उपलब्ध होऊ न शकल्याने त्याला संजूची जर्सी घालून मैदानावर उतरावे लागले. सामन्याच्या आदल्या दिवशी सूर्याने BCCI ला त्याच्या जर्सीच्या साईजबद्दल सांगितले. त्याने कसेतरी त्या जर्सीवर फोटोशूट केले, परंतु जर्सीची साईज बदलण्याची विनंती केली. सामन्याच्या दिवशी सूर्याला जी जर्सी दिली गेली ही लार्ज साईजची नसून मीडियम साईजची होती. त्यामुळे जो हा सामना खेळणार नाही, त्याची जर्सी मिळावी, अशी विनंती त्याने केली. त्यामुळे संजूची जर्सी घालून मुंबई इंडियन्सचा खेळाडू मैदानावर उतरला.
भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादव ( ४-६) व रवींद्र जडेजा ( ३-३७) यांच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर इशान किशनच्या ( ५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने २२.५ षटकांत ५ विकेट्स राखून विजय मिळवला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आज फलंदाजीला नेहमीच्या क्रमांकावर न येता युवा खेळाडूंना संधी दिली.
रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत पाठवला. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्रने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली. ११५ धावांचे माफक लक्ष्य असताना रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला.