कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांनी अडखळत विजय मिळवला. 110 धावांचे आव्हान पेलताना भारताचे पाच फलंदाज माघारी फिरले. मात्र, भारतीय खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा सामन्याआधी घडलेल्या एका घटनेमुळे सलामीवीर गौतम गंभीर भलताच भडकला आहे. प्रथेनुसार या सामन्याच्या सुरुवातीला माजी क्रिकेटपटूंच्या हस्ते स्टेडियमवरील घंटा वाजवली जाते. यंदा तो मान माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मिळाला आणि वादाची ठिणगी पडली.
गंभीरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय), प्रशासकीय समिती आणि बंगाल क्रिकेट क्लब (कॅब) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्याने बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि कॅब यांना भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याच्या पॉलीसीची आठवण करून दिली. तो म्हणाला,''भारताने हा सामना जिंकला, परंतु बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि कॅब यांचा पराभव झाला. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, या तत्वालाच त्यांनी तिलांजली दिली. अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची निवडणुक लढवण्याची परवानगी मिळाली आहे, परंतु रविवारी जे घडले ते धक्कादायक होते. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या अझरुद्दीनला इडन गार्डनवरची ऐतिहासिक घंटा वाजवण्याचा मान कसा दिला जाऊ शकतो.''