लॉडरहील : सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील आज शेवटचा सामना अमेरिकेच्या धरतीवर पार पडत आहे. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर मजबूत पकड बनवली. अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्टइंडिजला १८९ धावांचे तगडे आव्हान दिले. भारताने २० षटकात ७ बाद १८८ एवढी धावसंख्या उभारली. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली तर दीपक हुड्डाने ३८ धावा केल्या आहेत. तर मधल्या फळीतील फलंदाजांनी साजेशी खेळी करून विंडीसमोर एक विशाल धावसंख्या उभी केली.
भारतीय संघाचा बोलबालातत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर ईशान किशन स्वस्तात माघारी परतला मात्र श्रेयस अय्यरने ताबडतोब फलंदाजी करून विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडला. शेवटच्या काही षटकांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करून विंडीच्या गोलंदाजांना चितपट केले. हार्दिकने १६ चेंडूत २८ धावांची ताबडतोब खेळी केली आणि शेवटच्या षटकात तो स्मिथकडून धावबाद झाला. वेस्टइंडिजकडून जेसन होल्डर, हेडन वॉल्श आणि डी ड्रेक्स यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. तर ओडियन स्मिथने ३ बळी पटकावून संजू सॅमसन (१५) आणि दिनेश कार्तिकला (१२) आणि अक्षर पटेल (९) यांना तंबूत पाठवले. होल्डरने त्याच्या दुसऱ्या षटकात अय्यरला बाद करून धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.
भारतीय संघात ४ बदलआजच्या सामन्यात भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात ४ बदल करण्यात आले असून कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाने मालिकेतील ३ सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजच्या सामन्याचा निकाल फारसा निर्णायक ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी वेस्टइंडिजचा संघ -निकोलस पूरन (कर्णधार), एस ब्रुक्स, शिमरॉन हेटमायर, आर. पॉवेल, डी.थॉमस, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, के.पॉल, डी ड्रेक्स, ओ. मॅकॉय, हेडन वॉल्श.