लॉडरहील : सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील आज शेवटचा सामना अमेरिकेच्या धरतीवर पार पडत आहे. या सामन्यात भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या ६४ धावांच्या वादळी खेळीच्या मजबूत पकड बनवली आहे. पावसाच्या विलंबामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला असून १४.३ षटकांपर्यंत १३५ धावांवर भारतीय संघ खेळत आहे. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली तर दीपक हुड्डाने ३८ धावा केल्या आहेत.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर ईशान किशन स्वस्तात माघारी परतला मात्र श्रेयस अय्यरने ताबडतोब फलंदाजी करून विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडला. विंडीजकडून जेसन होल्डर, हेडन वॉल्श आणि डी ड्रेक्स यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. होल्डरने त्याच्या दुसऱ्या षटकात अय्यरला बाद करून धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. तर भारताकडून हार्दिक पांड्या (६) आणि संजू सॅमसन (९) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत.
भारतीय संघात ४ बदल
आजच्या सामन्यात भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात ४ बदल करण्यात आले असून कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाने मालिकेतील ३ सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजच्या सामन्याचा निकाल फारसा निर्णायक ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी वेस्टइंडिजचा संघ -
निकोलस पूरन (कर्णधार), एस ब्रुक्स, शिमरॉन हेटमायर, आर. पॉवेल, डी.थॉमस, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, के.पॉल, डी ड्रेक्स, ओ. मॅकॉय, हेडन वॉल्श.
Web Title: IND vs WI T20 India West Indies match has been stopped for a while due to rain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.