चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आता विराट विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रोहितला दोन विक्रम खुणावत आहेत. रोहितने जर आपला फॉर्मा कायम राखला तर त्याला या सामन्यात हा विक्रम रचता येऊ शकतो.
रोहित सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला होता.
गेल्या सामन्यात शतक लगावताना रोहितने सात षटकार लगावले होते. या सामन्यात त्याने जर पुन्हा सात षटकार लगावले तर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. या वर्षात सर्वाधिक षटकार न्यूझीलंडच्या कॉलिन मुर्नोच्या (35) नावावर आहेत. रोहितच्या नावावर सध्या 29 षटकार आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याने सात षटकार लगावले तर त्याच्या नावावर हा विक्रम होऊ शकतो.
रोहितला अजून एक विक्रम खुणावत आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावून त्याने भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रचला होता. पण या सामन्यात त्याने 69 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. रोहितच्या नावावर सध्या 2203 धावा आहेत. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर 2271 धावा आहेत. त्यामुळे रोहितॉने 69 धावा केल्यास त्याच्या नावावर हा विक्रमही होऊ शकतो.