IND vs WI T20I Series : रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेऊन रोहित टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत त्याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मंगळवारी रोहितसह रिषभ पंत, दिनेश कार्तिक आदी ७ भारतीय खेळाडू कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू विश्रांतीवर असल्याने या मालिकेत ते खेळणार नाहीत. अशात टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
भारताचा सलामीवीर आणि उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) या संपूर्ण ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दुखापतीतून सावरण्यासाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. पण, तेथे त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला ट्वेंटी-२० संघासोबत प्रवास करता आलेला नाही. तो कोरोनातून सावरला असून आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. पण, तो वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही, असे BCCIच्या सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही इंग्रजी वृत्तपत्रांच्या माहितीनुसार लोकेश राहुलच्या जागी दुसऱ्या कोणत्याच खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून निवड केली जाणार नाही. ''राहुल विलगिकरणातून बाहेर आला आहे आहे, परंतु त्याला नियमाप्रमाणे NCAची तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे. त्याच्याकडे तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ नाही, २९ जुलैपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होतेय,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. ट्वेंटी-२० संघात इशान किशन आधीच असल्यामुळे लोकेश राहुलच्या जागी आणखी कोणाची निवड केली जाणार नसल्याचेही, सूत्रांनी स्पष्ट केले. ट्वेंटी-२० मालिकेत रोहित शर्मासह रिषभ पंत किंवा इशान किशन सलामीला खेळू शकतात.
भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
ट्वेंटी-२० मालिका-
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)