Rinku Singh, Team India: इंडियन प्रीमियर लीगच्या नुकत्याच झालेल्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि अनेक सामने एकहाती जिंकणाऱ्या रिंकू सिंगची संघात निवड करण्यात आली नाही. भारतीय क्रिकेट संघाला सध्या नवीन चीफ सिलेक्टर मिळाला. माजी मुंबईकर क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यावर संघनिवडीची जबाबदारी होती. त्याने निवडलेल्या संघात 'मुंबई इंडियन्स'चा प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याची निवड झाली. पण IPL मध्ये तिलक वर्मापेक्षा जास्त धावा करणारा रिंकू सिंग मात्र टीम इंडियाला नकोसा झाला आहे का, असा सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विचारला.
रिंकूचा पत्ता कोणी कापला?
वेस्ट इंडिजचा दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत रिंकूला संघात जागा मिळाली नाही. कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला संघात स्थान मिळू शकत नाही याचे कारण सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन देखील मधल्या फळीत आहेत. अशा परिस्थितीत या ठिकाणी कोणालाही ठेवणे शक्य असे बोलले जात आहे. त्यामुळे जस्टिस फॉर रिंकू सिंग हा टॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागल्याचे दिसले.
2017 मध्ये IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या रिंकूने 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या. त्यात त्याने सहा वेळा नाबाद राहताना चार अर्धशतके झळकावली. एका षटकात सलग पाच षटकार मारून गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतानाची त्याची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. रिंकू सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनसाठी खेळत आहे. खेळपट्टीवर स्थिरावण्याची त्याची कला आणि वेगाने धावा करत सामना जिंकवून देण्याची त्याची कसब त्याला नक्कीच टीम इंडियात संधी मिळवून देईल असे बोलले जात आहे. पण यावेळी त्याची संधी हुकल्याने नेटकरी नाराज झाल्याचे दिसून आले आहे.
रोहित-विराट हळूहळू टी२० मधून बाहेर...
रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ फलंदाजांना पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की त्यांना टी२० सामन्यांमधून हळूहळू बाहेर काढले जात आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई हे दोन खेळाडू संघात कमबॅक करत आहेत.
भारताचा टी२० संघ- इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.