India vs West Indies, T20I Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात १६ फेब्रुवारीपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विंडीजचा पाहुणचार करण्यास तयार आहेत. पण, वेस्ट इंडिजनं तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी जाहीर केलेला संघ पाहून यजमानांसमोर तगडे आव्हान दिसत आहे. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीचा संघ वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं जाहीर केला. यात ख्रिस गेल व एव्हिन लुईस या स्फोटक फलंदाजांची नावं गायब असली तरी इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या मालिकेत ५१ चेंडूंत शतक झळकावणारा रोव्हमन पॉवेल संघात कायम आहे.
ख्रिस गेल व एव्हिन लुईस यांच्यानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो विंडीजचा तिसरा फलंदाज आहे. त्यानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ५१ चेंडूंत शतक पूर्ण करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानं ५३ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांच्या मदतीनं १०७ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याला भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संघात कायम राखले आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध खेळणाऱ्या ट्वेंटी-२० संघात विंडीजनं कोणताच बदल केलेला नाही.
वेस्ट इंडिजचा संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), फॅबियन एलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार्ह ब्रुक्स, जेसन होल्डर, शे होप, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारिओ शेफर्ड, ओदीन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेतील तीन वन डे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील.