सेंट किट्स - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याची वेळ बदलावी लागली होती. त्यामुळे प्रेक्षकही अवाक् झाले होते. दरम्यान, आता दोन्ही संघात होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्याचीही वेळ बदलण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज सेंट किट्समधील वॉर्नर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळवण्यात येणार होता. मात्र आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्याच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली आहे. बीसीसीआयकडून सांगण्यात आले की, तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र आता नाणेफेक ९ वाजता होईल आणि प्रत्यक्ष सामन्याला ९.३० वाजता सुरुवात होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेतही ऐनवेळी बदल करण्यात आला होता. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र प्रत्यक्ष सामन्याला रात्री ११ वाजता सुरुवात झाली होती. खेळाडूंचे महत्त्वपूर्ण सामान उशिराने पोहोचल्याने सामन्याला उशीर झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमध्ये खेळवला गेला होता. त्या सामन्यात भारताने ६८ धावांनी बाजी मारली होती. तर काल सेंट किट्समध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ५ विकेट्स राखून मात केली होती. त्यामुळे आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.