हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विक्रमांचे इमले रचणाऱ्या विराटला आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना त्याने शतकी खेळी केली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत विराटला पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
राजकोट कसोटीत विराटने शतक झळकावून एक विक्रम नावावर केला होता. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात जलद 24 शकत पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. तसेच चालू कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने सलग तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. हैदराबाद कसोटीत त्याला आणखी एक विक्रम खुणावत आहे.
या कसोटीत शतक केल्यास तो पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याच्या 25 कसोटी शतकाच्या विक्रमाशी बरोबरी करेल. इंझमामने 120 कसोटीत 8830 धावा केल्या आहेत. युनिस खान (34 शतके) याच्यानंतर सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा इंझमाम हा दुसरा पाकिस्तानचा खेळाडू आहे.