हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येईल. मात्र, तत्पूर्वी निवड समिती आगामी वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. वन डे मालिकेसाठी रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु आगामी महत्त्वाचे दौरे लक्षात घेता कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतील.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा फॉर्म हा चिंतेचा विषय असला तरी त्याचे संघातील स्थान कायम राहणार आहे. राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतला संधी मिळू शकते आणि त्यामुळे दिनेश कार्तिकला संघाबाहेर बसावे लागेल. निदाहास चषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत त्याने दमदार खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंड आणि आशिया चषक स्पर्धेत त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला निवड समितीला प्रभावीत करण्यासारखी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे पंतने कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केल्याने वन डेतही त्याचाच पर्याय निवड समितीसमोर आहे.