गुवाहाटी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात खणखणीत अर्धशतक झळकावले. त्याने 37 चेंडूंत 10 चौकार लगावताना वैयक्तिक पन्नास धावांचा पल्ला पार केला. 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन ( 4) लगेच माघारी परतला. त्यानंतर विराटने उपकर्णधार रोहित शर्मासोबत भारताच्या धावांचा वेग कायम राखताना अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने आणखी एक विक्रम नावावर केला.
विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 145 वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 144 अर्धशतकांना मागे टाकले. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणाऱ्यांमध्ये विराट तिसऱ्या स्थानी आला आहे. या यादित महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 264) आणि राहुल द्रविड ( 193) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. गांगुलीनंतर पाचव्या स्थानावर महेंद्रसिंग धोनी ( 117) चा क्रमांक येतो.