गुवाहाटी : विराट कोहलीने सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम केला. विराटने 37 चेंडूंत 10 चौकार लगावताना वैयक्तिक पन्नास धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्याने 2018 वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून 2000 धावा करण्याचा विक्रमही केला. यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटने सलग दुसऱ्या वर्षी हा पराक्रम केला आहे. त्याने गतवर्षी 2818 धावा केल्या होत्या.
एका वर्षात सर्वाधिक वेळा 2000 धावांचा पल्ला पार करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या बाजूला जाऊन बसला आहे. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा एका वर्षात 2000 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विराटने त्या विक्रमाशी आज बरोबरी केली. या पल्ला सर करताच त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या ( 4) विक्रमाला मागे टाकले.