विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यांत रोहित शर्माने धावांची आतषबाजी केली. याबरोबर रोहितने अनेक विक्रमही नावावर केले. रोहितने पहिल्या सामन्यात 8 गगनचुंबी षटकार खेचले आणि दुसऱ्या सामन्यात त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम खुणावत आहे. आजच्या सामन्यात त्याला तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी केवळ दोन षटकार लगावण्याची आवश्यकता आहे.
तेंडुलकरने त्याच्या वन डे कारकिर्दीत 195 षटकार खेचले आहेत. रोहितच्या नावावर 194 षटकार आहेत आणि दोन षटकार लगावताच तो तेंडुलकरचा विक्रम मोडू शकणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या वन डे सामन्यात त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 190 षटकारांचा विक्रम मोडला होता.
रोहितने पहिल्या वन डे सामन्यात नाबाद 152 धावांची खेळी केली होती. त्या खेळीबरोबर त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. रोहितने वन डे कारकिर्दीत सहावेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. तेंडुलकरला केवळ पाचवेळाच अशी कामगिरी करता आली आहे.