तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात टाकली. भारताचा हा वेस्ट इंडिजविरुद्धचा आठवा मालिका विजय ठरला. यापूर्वी भारताने 2006 साली वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवला होता.
भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांचा फक्त 104 धावांत खुर्दा उडवला. भारताकडून रवींद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक चार बळी मिळवले. वेस्ट इंडिजच्या 105 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी नाबाद 63 धावांची दमदार खेळी साकारली. कोहलीने यावेळी नाबाद 33 धावा केल्या.