त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत भुवनेश्वर कुमार आणि जस्प्रीत बुमरा यांच्या पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. चौथ्या सामन्यात भुवनेश्वरला सूर गवसला नसला तरी तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. पाचव्या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर खिळल्या असतीलच, परंतु कुलदीपही चर्चेत आला आहे. त्याला एक विक्रम नावावर करण्यासाठी विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवावा लागेल.
कुलदीपला 2018 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. कुलदीपने या मालिकेत सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत, तर युजवेंद्र चहलच्या नावावर पाच विकेट आहेत. बुमराने दोन सामन्यात चार बळी टिपले आहेत. 2018 मध्ये कुलदीपने 18 सामन्यांत 44 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानचा रशीद खान 48 विकेटसह आघाडीवर आहे. कुलदीपला या यादीत अव्वल स्थान गाठण्यासाठी आज पाच विकेट घ्याव्या लागतील.