त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांची शिखरं सर केली. मात्र, मुंबईकर रोहित शर्मानेही त्याच्या तोडीसतोड खेळ करताना चार सामन्यांत दोन वेळा दीडशतकी धावांचा पल्ला ओलांडला. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहून त्याच्याकडून आणखी एका द्विशतकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. पाचव्या वन डे सामन्यात त्याला अनोखी डबल सेंच्युरी झळकावण्याची संधी आहे. या सेंच्युरीसह त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
हिटमॅन रोहितने या मालिकेत धावांचा पाऊस पाडताना षटकारांचीही आतषबाजी केली आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात त्याने 152 धावांची खेळी करून माजी कर्णधार सौरव गांगुलीचा षटकारांचा विक्रम मोडला. त्यानंतर चौथ्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही षटकारांचा विक्रम मोडला. वन डे कारकिर्दीत रोहितच्या नावावर 198 षटकार जमा आहेत आणि त्याला षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्याची संधी आहे.
पाचव्या सामन्यात दोन षटकार खेचताच तो षटकारांचे द्विशतक पूर्ण करेल आणि न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकलमच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे. 200 षटकार खेचणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. धोनीच्या नावावर 218 षटकार आहेत. या यादित पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी ( 351), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (275), श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (270), धोनी ( 218) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स ( 204) आघाडीवर आहेत.
Web Title: IND vs WIN 5th ODI: Rohit Sharma on cusp of a special double century, to join MS Dhoni in elite list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.