त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांची शिखरं सर केली. मात्र, मुंबईकर रोहित शर्मानेही त्याच्या तोडीसतोड खेळ करताना चार सामन्यांत दोन वेळा दीडशतकी धावांचा पल्ला ओलांडला. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहून त्याच्याकडून आणखी एका द्विशतकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. पाचव्या वन डे सामन्यात त्याला अनोखी डबल सेंच्युरी झळकावण्याची संधी आहे. या सेंच्युरीसह त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
पाचव्या सामन्यात दोन षटकार खेचताच तो षटकारांचे द्विशतक पूर्ण करेल आणि न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकलमच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे. 200 षटकार खेचणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. धोनीच्या नावावर 218 षटकार आहेत. या यादित पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी ( 351), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (275), श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (270), धोनी ( 218) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स ( 204) आघाडीवर आहेत.