मुंबई : भारताने कसोटी मालिकेनंतर वन डे मालिकेतही वेस्ट इंडिज संघाला पराभवाची चव चाखवली. भारताने पाच सामन्यांची ही मालिका 3-1 अशी जिंकली. त्रिवेंद्रम येथे झालेला पाचवा आणि अखेरचा सामना भारताने एकहाती जिंकला. मात्र, या सामन्यात असे काही घडले, की ज्यामुळे चाहत्यांनी कर्णधार विराट कोहलीवर टीकांचा पाऊस पाडला.
भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीमुळे चाहत्यांनी कोहलीला धारेवर धरले. धोनीला भारताकडून दहा हजार धावा करण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता होती. पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा संपूर्ण संघ 31.5 षटकातं 104 धावांत माघारी पाठवला. भारताने हे लक्ष्य 14.5 षटकांत एक विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोहली स्वतः तिसऱ्या क्रमांकावर न येता धोनीला पाठवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. धोनी या सामन्यात दहा हजार धावांचा विक्रमही करेल, असे वाटले होते. परंतु, कोहलीच फलंदाजीला आला आणि त्याने नाबाद 33 धावा केल्या. कोहलीच्या या वागण्याचा चाहत्यांना राग आला आणि त्यांनी कोहलीवर टीका केली.