नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : महेंद्रसिंग धोनीला एकेकाळी सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला धोनी आगामी विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल संभ्रम आहे. काही क्रिकेट पंडितांनी तर उद्या वेस्ट इंडिजबरोबरचा त्याचा अखेरचा वनडे सामना असेल, असे मतही व्यक्त केले आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी सध्या वाईट काळ सुरु आहे, असं काही जण म्हणत आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. धोनीला गेल्या वर्षभरात फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धोनीला ट्वेन्टी-20 संघातून वगळण्यात आले, असे म्हटले जात आहे. धोनीचा अखेरचा सामना असल्यामुळे तिरुवनंतपुरमला त्याचा 35 फुटी मोठा कट-आऊट लावण्यात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर धोनी भारतात वनडे खेळणार नाही, असे काही क्रिकेट पंडितांनी म्हटले आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा असेल. या दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला जाणार आहे. विश्वचषकानंतर धोनी राजीनामा देणार, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीचा उद्या होणारा भारतातील अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.