India vs Zimbabwe 1st ODI Live : गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेने विजयासाठी ठेवलेले १९० धावांचे लक्ष्य या दोघांच्या दमदार खेळीमुळे भारताने १० विकेट्स राखून सहज पार केले. या दोघांनी २१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रमही मोडला.
सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांनी धक्कातंत्र कायम राखताना यजमानांना हतबल केले. पण, रिचर्ड एनगाराव्हा व ब्रॅड इव्हान्स यांनी ९व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. चहरने २७ धावांत ३, कृष्णाने ५० धावांत ३ आणि पटेलने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सिराजने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात, शिखर धवनने ( Shikhar Dhawna) मोठा विक्रम केला.
रिचर्ड एनगाराव्हा व ब्रॅड इव्हान्स या जोडीने ९व्या विकेटसाठी ४९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून झिम्बाब्वेचा डाव सावरला. भारताविरुद्धची झिम्बाब्वेच्या ९व्या विकेटही केलेली ही वन डेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९९८मध्ये पी स्ट्रँग व ए व्हायटल यांनी ५३ धावांची भागीदारी केली होती. ७० धावांची ही भागीदारी कृष्णाने तोडली. त्याने एनगाराव्हाला त्रिफळाचीत केले. झिम्बाब्वेच्या फलंदाजाने ४२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत १८९ धावांत माघारी परतला. चहर, कृष्णा व पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने पहिल्याच षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमन गिलसह त्याने भारताच्या धावांचा ओघ कायम राखला. या दोघांनी १० षटकांत ४३ धावा जोडल्या आणि धवनने एक पराक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून त्याने ६५०० धावा पूर्ण केल्या. सलामीवीर म्हणून हा टप्पा ओलांडणारा तो भारताचा पाचवा ओपनर ठरला. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा व वीरेंद्र सेहवाग हे आघाडीवर आहेत.
शिखर धनने मागील २२ डावांतील ११ वे अर्धशतक पूर्ण केले, तर गिलने मागील ४ डावांतील तिसरे अर्धशतक झळकावले. या दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये मागील ४ सामन्यांत तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली. धवन ११३ चेंडूंत ९ चौकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही ७२ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. या दोघांनी १९२ धावा करताना भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेविरुद्धची वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी २००१ मध्ये १३३ धावांची भागीदारी केली होती.
Web Title: IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan and Shubman Gill registered Highest opening partnership for INDIA against ZIMBABWE, India beat Zimbabwe by 10 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.