IND vs ZIM 1st T20I Live | हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यातून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताकडून मुकेश कुमारने यजमान संघाला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का दिला.
मुकेशने डावाच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर इनोसेंट कॅयाला बाहेरचा रस्ता दाखवला. चेंडू पडताच आतील दिशेने वळला अन् कॅयाचा त्रिफळा उडाला. त्याला खातेही उघडता आले नाही. आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. पाहुण्या टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड मैदानात आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (पदार्पण), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.
झिम्बाब्वेचा संघ - सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक आहेत. यापूर्वीही काही छोटेखानी स्पर्धांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा प्रवास २९ जून रोजी संपला.