India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाबे-भारत यांच्यातला दुसरा सामना हरारे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीला बोलावले आहे. मागच्या सामन्यातील चूका टाळून झिम्बाब्वेने सावध सुरुवात केली, परंतु यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) दोन अफलातून कॅचने झिम्बाब्वेला पुन्हा पहिल्या सामन्यातील परिस्थितीवर आणले. दीपक चहरच्या जागी आज संघात स्थान मिळालेल्या शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) एकाच षटकात दोन धक्के दिले.
पहिल्या सामन्यात शिखर धवन व शुबमन गिल या दोघांनीच १९० धावांचे लक्ष्य पार करून भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला होता. झिम्बाब्वेविरुद्धचा हा भारताचा सलग १३ वा वन डे सामन्यातील विजय ठरला. दीपक चहर पहिल्या वन डे सामन्यातील सामनावीर होता, सहा महिन्यांनंतर मैदानावर परतलेल्या चहरने तीन विकेट्स घेत झिम्बाब्वेला सुरुवातीलाच धक्के दिले होते. लोकेशने मात्र दीपकच्या न खेळण्यामागचं कारण सांगितलं नाही. झिम्बाब्वेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. तकुडवानाशे कैटानो व तनाका चिवांगा यांना संघात स्थान देऊन तदीवानाशे मरुमानी व रिचर्ड एनगाराव्हा यांना बाकावर बसवले आहे.
कैटानो व इनोसेंट काइया ही जोडी सलामीला आली आणि त्यांनी ८.४ षटकांत २० धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिला धक्का देताना कैटानोला ( ७) बाद केले. संजूने यष्टिंमागे सुरेख झेल घेतला. त्यानंतर शार्दूलने १२व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने चौथा धक्का देताना झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ३१ अशी केली. झिम्बाब्वेने १० चेंडूंत तीन विकेट गमावल्या.