India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाब्वेने दुसऱ्या वन डे सामन्यातही भारतीय गोलंदाजांसमोर पुन्हा गुडघे टेकले. दीपक चहरच्या जागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेल्या शार्दूल ठाकूरने एकाच षटकात दोन विकेट घेत गेम चेंज केला. सीन विलियम्स, सिकंदर रजा व रायन बर्ल यांनी झिम्बाब्वेकडून संघर्ष केला, परंतु त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. पहिल्या वन डेत झिम्बाब्वेने १८९ धावा केल्या होत्या, परंतु आज त्यापेक्षाही कमी धावा त्यांच्या झाल्या.
झिम्बाब्वेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. तकुडवानाशे कैटानो व तनाका चिवांगा यांना संघात स्थान देऊन तदीवानाशे मरुमानी व रिचर्ड एनगाराव्हा यांना बाकावर बसवले आहे. कैटानो व इनोसेंट काइया ही जोडी सलामीला आली आणि त्यांनी ८.४ षटकांत २० धावा केल्या. मोहम्मद सिराजने पहिला धक्का देताना कैटानोला ( ७) बाद केले. संजूने यष्टिंमागे सुरेख झेल घेतला. त्यानंतर शार्दूलने १२व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने चौथा धक्का देताना झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ३१ अशी केली होती. झिम्बाब्वेने १० चेंडूंत तीन विकेट गमावल्या.
सिकंदर रजा व सीन विलियम्स या जोडीने झिम्बाब्वेचा डाव सावरला आणि ५० चेंडूंत ४१ धावा जोडल्या. कुलदीप यादवने ही भागीदारी सोडली. रजा ३१ चेंडूंत १६ धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेचा निम्मा संघ ७५ धावांत तंबूत परतला. आता सर्व भिस्त विलियम्सनवर होती, परंतु दीपक हुडाने त्याची विकेट घेत झिम्बाब्वेला धक्का दिला. विलियम्सन ४२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. रायन बर्लने भारतीय गोलंदाजांना टक्कर दिला. मागील सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलला आज यश मिळत नव्हते. पण, सातव्या षटकात पटेलला विकेट मिळाली. त्याने ब्रॅड इव्हान्सला ( ९) माघारी पाठवले. व्हिक्टर एनयाऊची भोपळ्यावर रनआऊट झाला. बर्ल ४१ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी परतला.