India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून विजय मिळवला. पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट गमावून सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याच्या विक्रमात आजचा निकाल अव्वल झाला. यापूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने झिम्बाब्वेवरच १३५ चेंडू राखून विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ ( वि. बांगलादेश) व २००६ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध अनुक्रमे १२४ व १२३ चेंडू राखून विजय मिळवला होता. या सामन्यात यष्टिरक्षक संजू सॅमसन ( Sanju Samson) याला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पण, सामन्यानंतर असा एक प्रसंग घडला की ज्याने संजू इमोशनल झाला.
सीन विलियम्स ( ४२) व रायन बर्ल ( ४१*) यांनी झिम्बाब्वेकडून संघर्ष केला, परंतु त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी परतला. शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. भारताकडून शिखर धवनने ३३, शुबमन गिलने ३३, दीपक हुडाने २५ व संजूने ३९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. भारताने २५.४ षटकांत ५ बाद १६७ धावा करून हा सामना जिंकला. या सामन्यानंतर एक चिमुकला संजूकडे चेंडू घेऊन ऑटोग्राफसाठी धावत आला अन् त्याला पाहून संजू इमोशनल झाला.
पण का?दरम्यान, आजचा हा सामना झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने देशातील कॅन्सरग्रस्त मुलांसाठी समर्तित केला होता. आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरी झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेने सामाजिक भान जपले आहे. त्यांच्या देशातील कॅन्सरग्रस्त मुलांना त्यांनी आजचा सामना समर्पित केला आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीशी आर्थिक मदतही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होतंय. संजूकडे धावत आलेल्या त्या मुलाला कॅन्सर झाला आहे आणि जेव्हा त्याने आणलेल्या चेंडूवर स्वाक्षरी करताना संजूला गहिवरून आले होते. हे त्याने सामन्यानंतर कबुल केले.