India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली असली तरी आजचा सामना सिंकदर रझाने ( Sikandar Raza) गाजवला. त्याने अखेरपर्यंत संघर्ष करताना झिम्बाब्वेच्या विजयासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले. विजयासाठी १५ धावा हव्या असताना भारताचा शतकवीर शुबमन गिल याने त्याला अफलातून झेल घेऊन माघारी पाठवले. शुबमनने ( Shubman Gill) या सामन्यात पहिले वहिले शतक झळकावले. सिंकदरने ( Sikandar Raza ) अखेरपर्यंत झुंज दिली. त्याच्या शतकी खेळीने झिम्बाब्वेच्या चाहत्यांना आनंदी केली. ५ विकेट्स घेणाऱ्या ब्रँड इव्हान्सने आठव्या विकेटसाठी सिकंदरला साथ देताना शतकी भागीदारी केली.
संघातील अनुभवी खेळाडू सीन विलियम्स व टोनी मुनयोंगा यांनी ४६ धावांची भागीदारी करून झिम्बाब्वेची वाटचाल योग्य दिशेने सुरू ठेवली होती. पण, अक्षर पटेलच्या फिरकीने घात केला. विलियम्सन ४६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर पायचीत झाला. त्यापाठोपाठ आवेशने टोनीला ( १५) बाद करून दोन्ही सेट फलंदाज माघारी पाठवले. रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेला कैटानो पुन्हा फलंदाजीला आला, परंतु कुलदीप यादवने त्याला यष्टिचीत होण्यास भाग पाडले. कर्णधार रेगीस चकाब्वा ( १६) याला अक्षरने कॉट अँड बोल्ड केले. झिम्बाब्वेचा निम्मा संघ १२२ धावांत तंबूत परतला. सिकंदर रझा सोडल्यास झिम्बाब्वेचे फलंदाज ढेपाळले. सिकंदरने ५९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सिकंदरने अखेरपर्यंत एकट्याने संघर्ष सुरू ठेवला होता. ५ विकेट्स घेणाऱ्या ब्रॅड इव्हान्सने आठव्या विकेटसाठी सिकंदरला साथ देताना शतकी भागीदारी केली. या दोघांनी २४ चेंडूंत ४० धावांची गरज असा सामना चुरशीचा बनवला. सिंकदरने ८८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने सहावे शतक पूर्ण केले. मागील ६ वन डे सामन्यांतील धावांचा पाठलाग करतानाचे हे त्याचे तिसरे शतक ठरले. झिम्बाब्वेला १८ चेंडूंत ३३ धावा हव्या असताना हा सामना इतिहास घडविणारा ठरतो की काय असे वाटू लागले होते. सिकंदरने ४८व्या षटकात आवेशला चोपून काढताना सलग चौकार-षटकार खेचला. त्या षटकात १६ धावा आल्या आणि ब्रॅड २८ धावांवर माघारी परतल्याने ७७ चेंडूंतील १०४ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
झिम्बाब्वेला १२ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या. शार्दूल ठाकूरने ४९व्या षटकात सिंकदरची विकेट घेतली, शुबमनने अफलातून झेल घेतला. सिंकदर ९५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर माघारी परतला. भारतीय खेळाडूंनी सिंकदरच्या या खेळीचं कौतुक केलं. झिम्बाब्वेचा डाव २७६ धावांवर गडगडला अन् भारताने १३ धावांनी सामना जिंकला.