नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामधील एकदिवसीय मालिकेतील तिसराही सामना जिंकून भारताने ३-० ने मालिकेवर कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने चांगलीच टक्कर देऊन सामन्यात रंगत आणली होती. सिकंदर रझाच्या (Sikandar Raza) शानदार शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेचा संघ विजयाच्या जवळपास पोहचला होता, पण अखेरीस भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि १३ धावांनी सामना आपल्या नावावर केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप करून मालिका खिशात घातली. झिम्बाब्वेला त्यांच्याच धरतीवर पराभूत केल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जल्लोष साजरा केला.
भारताचा ३-० ने मोठा विजय
दरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील खेळाडू तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामधील विजयाचा डान्स करून जल्लोष साजरा करत आहेत. गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला धवन काळा चष्मा घालून संघासोबत डान्स करताना दिसत आहे. त्याच्यासोबत संघातील बाकीचे खेळाडू देखील 'काला चष्मा' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत शुबमन गिलने १०३ धांवाची शानदार शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ८ गडी गमावून २८९ एवढी धावसंख्या उभारली. त्यानंतर सिकंदर रझा (११५) च्या शतकानंतरही झिम्बाब्वेचा संघ तीन चेंडू बाकी असताना २७६ धावांत गुंडाळला गेला. गिलने एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकार मारून हि किमया साधली. गिलने तीन सामन्यांमध्ये १२२.५० च्या सरासरीने २४५ धावा केल्या आणि त्यासाठी त्याला सामनावीर तसेच मालिकावीर म्हणून देखील घोषित करण्यात आले.