IND vs ZIM 1st T20I Live | हरारे : झिम्बाब्बेविरूद्धच्या पहिल्या सामन्यातून रियान परागने भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्यासह ध्रुव जुरेल आणि अभिषेक शर्मा यांना आपल्या राष्ट्रीय संघाचे तिकीट मिळाले. रियान परागला त्याच्या वडिलांनी पदार्पणाची कॅप सोपवली. हा भावनिक क्षण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत आहे. खरे तर रियानचे वडील पराग दास हे आसामचे माजी क्रिकेटर राहिले आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आसामच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. रियान आणि त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यातून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. पाहुण्या टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड मैदानात आहे.
दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना रियान परागने स्फोटक खेळी केली होती. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो अनेकदा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर राहिला. आयपीएल २०२४ च्या हंगामात रियानला ५६७ धावा करण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (पदार्पण), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.
झिम्बाब्वेचा संघ - सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.