Team India Tour of Zimbabwe, IND vs ZIM T20 Series : ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकताच भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला सहा तारखेपासून सुरुवात होत आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या संघात मोठा बदल केला असून तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जागी पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना संधी मिळाली आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वीही काही छोटेखानी स्पर्धांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा प्रवास २९ जून रोजी संपला. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे, त्याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेअर केले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण देखील संघासोबत दिसले, जे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होतील. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.