IND vs ZIM T20 Series : भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून, तिथे टीम इंडियाची युवा ब्रिगेड सहा तारखेपासून पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळेल. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे झिम्बाब्बे दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या अभिषेक शर्माचा देखील समावेश आहे. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून स्फोटक खेळी करणाऱ्या अभिषेकने राष्ट्रीय संघात संधी मिळताच भावनिक प्रतिक्रिया दिली.
६ जुलै ते १४ जुलै या कालावधीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सर्व सामने खेळवले जातील. टीम इंडिया तिथे पोहोचली असून, बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिषेक शर्मा विविध बाबींवर प्रकाश टाकतो. आयपीएल २०२४ मध्ये त्याने स्फोटक खेळी करताना २०४.२१ च्या स्ट्राईक रेटने १६ सामन्यांत ४८४ धावा कुटल्या. त्याने एका हंगामात ४२ षटकार मारण्याची किमया साधली.
अभिषेक शर्माने सांगितले की, माझी भारतीय संघात निवड होताच कर्णधार शुबमन गिलचा फोन आला. मला तेव्हा खूप चांगले वाटले. मी घरी गेलो तर तेव्हा माझे कुटुंबीय मुलाखत देत होते. ते पाहताच मला अभिमान वाटला. पहिल्यापासून भारतीय संघासाठी खेळायचे माझे स्वप्न होते. त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज मला संधी मिळाली आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वीही काही छोटेखानी स्पर्धांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा प्रवास २९ जून रोजी संपला. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे, त्याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेअर केले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण देखील संघासोबत दिसले, जे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होतील. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Web Title: IND vs ZIM T20 Series shubhman Gill got a call as soon as i was selected in team india says Abhishek Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.