Team India Tour of Zimbabwe, IND vs ZIM T20 Series: टीम इंडियाने तब्बल १३ वर्षांनी २९ जूनला वर्ल्ड कप जिंकला. फायनलच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी विजय मिळवला. या विश्वविजेपदानंतर आता नव्या T20 मालिकेसाठी भारताचा नवखा संघ मैदानात उतरणार आहे. ५ सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा नव्या दमाचा संघ रवाना झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहेच. त्यासोबतच आणखीही काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवखा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यावर प्रशिक्षक कोण?
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक असतील. यापूर्वीही काही छोटेखानी स्पर्धांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा प्रवास २९ जून रोजी संपला. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे, त्याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेअर केले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण देखील संघासोबत दिसला, जो भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
बीसीसीआयने फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये टीमचे इतर सदस्यही दिसत आहेत. यामध्ये अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांसारख्या खेळाडूंचाही समावेश आहे. हे लोक पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत. T20 विश्वचषक 2024 च्या मुख्य संघात समाविष्ट असलेल्या १५ पैकी १३ खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी विश्वचषक संघातून केवळ यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांचीच निवड करण्यात आली आहे. शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांची T20 विश्वचषकासाठी प्रवासी राखीव म्हणून निवड करण्यात आली होती. पण ते मुख्य संघाचा भाग नव्हते. गिल, रिंकू, आवेश आणि खलील यांनाही संघात स्थान मिळाले आहे.
नितीश रेड्डीची माघार
नितीश रेड्डी यांचाही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पहिल्या संघात समावेश करण्यात आला होता, मात्र नंतर दुखापतीमुळे त्याचे नाव वगळण्यात आले. नितीशच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला. भारत ६ जुलै पासून हरारे येथे झिम्बाब्वेसोबत पाच सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे.
सामने कुठे पाहता येतील?
सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होतील. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, शिवम दुबे.