नवी दिल्ली : भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शनिवारी मध्यरात्री रवाना झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला तर अनुक्रमे २० आणि २२ ऑगस्ट रोजी शेवटचे दोन सामने खेळवले जातील. के.एल राहुलच्या नेतृत्वात आणखी एका मालिकेवर कब्जा करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच यजमान झिम्बाब्वेच्या संघाचे प्रशिक्षक डेव्ह हॉटन (Dave Houghton) यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका अशा शब्दांत त्यांनी भारताला इशारा दिला आहे.
भारतीय संघाला दिला इशाराडेव्ह हॉटन यांच्या मार्गदर्शनात झिम्बाब्वेचा संघ सध्यातरी उल्लेखणीय कामगिरी करत आहे. त्यांनी म्हटले, "आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही भारतीय संघाला पराभूत करू शकतो. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मी येण्यापूर्वी होती तशीच चांगली आहे. याशिवाय आमच्याकडे काही असे फलंदाज आहेत जे सध्या शानदार खेळी करत आहेत."
"सध्या झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे, मात्र भारताविरूद्ध खेळताना ही आमच्यासाठी मोठी अग्निपरीक्षा असेल कारण आम्ही जगातील सर्वात मजबूत संघाविरूद्ध खेळत आहोत. पण तरीही संघ चांगली कामगिरी करेल याची मला आशा आहे तसेच चांगली स्पर्धा होईल", असे हॉटन यांनी अधिक म्हटले.
डेव्ह हॉटन यांच्या मार्गदर्शनात झिम्बाब्वेचा संघ
झिम्बाब्वेने अलीकडेच एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे साहजिकच भारताविरूद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या संघाचा आत्मविश्वास वाढला असेल. याशिवाय झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे. नवनिर्वाचित प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांच्या मार्गदर्शनात झिम्बाब्वेच्या संघाने २०१७ पासून पहिल्यांदाच कोणत्या नामांकित संघाविरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. झिम्बाब्वेने टी-२० मालिका देखील २-१ ने जिंकली होती, जी नांमाकित संघाविरूद्ध जिंकलेली पहिली टी-२० मालिका ठरली होती.
झिम्बाब्वेविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -के.एल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.