Join us  

IND-W vs AUS-W:भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला? 

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये आज क्रिकेटच्या फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 10:38 AM

Open in App

CWG 2022 | बर्गिंहॅम :  राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वातील भारतीय महिला संघाने शनिवारी यजमान इंग्लिश संघाला ४ धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. यासह हरमनप्रीतच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे, कारण ती पुरूष किंवा महिला क्रिकेटमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये (Commonwealth Games 2022) पदक जिंकणारी पहिली भारतीय कर्णधार ठरणार आहे. भारताने उपांत्यफेरीत इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज होणाऱ्या फायनलच्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असणार आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्यफेरीत न्यूझीलंडला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवले. आजचा फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होईल. 

भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक दरम्यान, भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून यापूर्वी १९९८ मध्ये पुरूष क्रिकेटला या स्पर्धेत स्थान मिळाले होते. तेव्हा भारतीय संघाला एकही पदक जिंकण्यात यश आले नव्हते. मात्र आज भारतीय महिलांना सुवर्ण जिंकणे हे एक मोठे आव्हान आहे, कारण संघाला आतापर्यंत एकही ग्लोबल टूर्नामेंट जिंकण्यात यश आले नाही. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये यजमान संघाने भारताचा पराभव केला होता. 

ऑस्ट्रेलियाने २ वर्षांपूर्वी केलेल्या मोठ्या घावाचा बदला आज भारतीय महिला घेतात का हे पाहण्याजोगे असेल. याशिवाय या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात देखील भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाला आज सुवर्ण जिंकण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूला शानदार खेळी करायला हवी. 

८५ धावांनी झाले होते स्वप्न भंगमार्च २०२० मध्ये मेलबर्नच्या मैदानावर पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कांगारूच्या संघाने भारतीयांचे स्वप्न भंग केले होते. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ एवढ्या धावांचा डोंगर उभारला होता. सलामीवीर फलंदाज लिस हिलीने ७५ तर बेथ मूनीने ७८ धावांची खेळी करून भारताला तगडे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्य ९९ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तिलाही अपयश आले. अखेर ऑस्ट्रेलियाने सांघिक खेळीच्या जोरावर विश्वचषकावर नाव कोरले.  

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयस्मृती मानधनाआॅस्ट्रेलियाइंग्लंडन्यूझीलंडसुवर्ण पदकटी-20 क्रिकेट
Open in App