Harmanpreet Kaur World Record : भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाला यश आले. सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने निर्धारित २० षटकांत १९७ धावा केल्या. १९८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना मात्र घाम फुटला अन् पराभव पत्करावा लागला. प्रत्युत्तरात भारतीय संघ ६ बाद केवळ १५९ धावा करू शकला.
इंग्लिश संघाने ३८ धावांनी पहिला सामना आपल्या नावावर केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला पराभव स्वीकारावा लागला असला तरी भारतीय कर्णधाराने इतिहास रचला आहे. खरं तर कर्णधार म्हणून हरमनने १०१ वा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तसेच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद सांभाळणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
भारताचा दारूण पराभव भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील १०१ वा ट्वेंटी-२० सामना बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झाला. पण, भारताच्या हाती निराशा लागली अन् दारूण पराभवाचा सामना करावा लागला. हरमनप्रीत कौर ही भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. या बाबतीत तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे सोडले आहे, जिने क्रिकेटच्या या लहान फॉरमॅटमध्ये १०० सामन्यांमध्ये कांगारूच्या संघाचे नेतृत्व केले.
दरम्यान, हरमनप्रीत कौरने जो पराक्रम केला आहे तो आजतागायत कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूने ट्वेंटी-२० मध्ये केलेला नाही. आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये एकूण ७८ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नंबर लागतो, ज्याने ७२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू
- हरमनप्रीत कौर - १०१ सामने
- मेग लॅनिंग - १०० सामने
- शार्लोट एडवर्ड्स - ९३ सामने
- चमारी अटापट्टू- ७६ सामने
- मेरिसा अगुइलेरा- ७३ सामने
- हीदर नाइट- ७२ सामने