लंडन - भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या संघाला इंग्लंडमध्ये व्हाईटवॉश देण्याची किमया साधली आहे. शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या १६९ धावांचा बचाव करताना भारतीय महिला संघाने इंग्लंडचा डाव १५३ धावांत गुंडाळला. मात्र या सामन्यात अखेरच्या क्षणी दीप्ती शर्माने खेळलेली एक चाल भारतीय संघाच्या विजयात निर्णायक ठरली.
१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांत माघारी परतले होते. त्यानंतर चार्लिन डीन हिने अखेरच्या सहकाऱ्यासह ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. आता इंग्लंडचा संघ चमत्कार घडवणार आणि भारताची व्हाईटवॉशची संधी हुकणार, असं वाटत असतानाच दीप्ती शर्मा हिने ४४ व्य षटकात डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले आणि इंग्लंडच्या झुंजीवर पाणी फिरवले.
४४ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी दीप्ती शर्मा हिने बॉलिंग मार्कवरून धावण्यास सुरुवात केली असतानाच यष्ट्यांजवळ आल्यावर डीन नॉन स्ट्राईकवर असलेली डीन ही लाईनच्या बाहेर असल्याचे दीप्तीला दिसले आणि तिने संधी साधून मागे वळत बेल्स उडवून डीनला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले. हे दृश्य पाहून सर्व खेळाडू काही क्षण स्तब्ध झाले. मात्र नव्या बदलानुसार अशा पद्धतीने बाद करण्यास आयसीसीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे डीन बाद ठरली.
या सामन्यात इंग्लंडकडून डीन ही सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज ठरली. तिने ८० चेंडूंचा सामना करताना ५८.७५ च्या स्ट्राईक रेटने ४७ धावा काढल्या. अवघ्या ३ धावांनी तिचे अर्धशतक हुकले. तसेच संघाला विजय मिळवून देण्यातही तिला अपयश आले.
Web Title: IND-W vs ENG-W: Mankading again on the cricket field, Deepti Sharma's move leaves the English team speechless
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.