बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून क्रिकेटने सर्वांनाच आकर्षित केले आहे. आता या क्रिकेटचा थरार उपांत्यफेरीपर्यंत पोहचला आहे, जिथे फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी इंग्लंड आणि भारत आमनेसामने आहेत. भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना या स्पर्धेच्या सुरूवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ताबडतोब अर्धशतकीय खेळी करून भारताला सहज विजय मिळवून दिला होता. आज क्रिकेटच्या पंढरीत देखील स्मृती आपल्या फलंदाजीने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडत आहे. स्मृती ७ षटकांपर्यंत २८ चेंडूत ५९ धावांवर खेळत आहे. विशेष म्हणजे तिने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.
मराठमोळ्या स्मृतीची आक्रमक फलंदाजी
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत स्मृती शानदार फलंदाजी करत आहे. स्मृतीने तिच्या अर्धशतकीय खेळीमध्ये एकूण ८ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत. तर शेफाली वर्मा सावध खेळी करून स्मृतीला साथ देत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संघाचा आपल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. नंतर आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला चितपट करून भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली. दरम्यान, बारबाडोसविरूद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामना जिंकून फायनलचे तिकिट मिळवणे हे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असेल. भारतीय संघ १ पराभव आणि २ विजयासह इथपर्यंत पोहचला आहे, त्यामुळे इंग्लिंश संघाला त्यांच्याच धरतीवर भारत चितपट करणार का हे पाहण्याजोगे असेल.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा. आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - नॅट सायव्हर (कर्णधार), डॅनी व्याट, सोफिया डंकले, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, माइआ बाउचर, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इझी वोंग, सारा ग्लेन.