IND W vs IRE W 3rd ODI India Registers Largest Margin Of Win Record : स्मृती मानधनाच्या कॅप्टन्सीत भारतीय महिला क्रिकेट संघानं आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात धावांसह विक्रमांची 'बरसात' केल्याचा सीन पाहायला मिळाला. आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघानं ३०४ धावांनी विजय मिळवला. वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील भारतीय महिला संघानं मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने पाहुण्या आयरिश महिलांना क्लीन स्वीप देत मालिका ३-० अशी खिशात घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाची कमाल, वनडेत साधला मोठया विजयाचा डाव
भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं ४३५ धावा करत आयरिश महिला संघासमोर ४३६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पाहुणा संघ १३१ धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय महिला संघाने ३०४ धावांसह मोठा विजय आपल्या नावे केला.
पहिल्यांदाच असं घडलं
याआधी भारतीय महिला संघानं २०१७ मध्ये आयर्लंड महिला संघाला २४९ धावांनी पराभूत केले होते. त्यावेळी संघाचे नेतृत्व हे मिताली राजनं केले होते. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
भारतीय महिला संघाचे वनडेतील सर्वात मोठे विजयाचा रेकॉर्ड
- विरुद्ध आयर्लंड - ३०४ धावांनी विजय, २०२५
- विरुद्ध आयर्लंड- २४९ धावांनी विजय, २०१७
- विरुद्ध वेस्टइंडिज -२११ धावांनी विजय, २०२४
- विरुद्ध पाकिस्तान- २०७ धावांनी विजय, २००८
महिला वनडे क्रिकेट जगतातील 'सातवं आश्चर्य' ठरला टीम इंडियाचा 'विक्रमी' विजय
१९९७ मध्ये किवी महिला संघानं पाकिस्तान महिला संघाला ४०८ धावांनी पराभूत केले होते. हा महिला क्रिकेट जगतातील वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यापाठोपाठ या यादीत ऑस्ट्रेलियन महिला संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघानं पाक महिला संघाला ३७४ तर डेन्मार्क महिला संघाला ३६३ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील मोठ्या विजयाचा रेकॉर्ड हा किवी महिला संघाच्या नावेच असल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये न्यूझीलंड महिला संघानं आयरिश महिलांना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अनुक्रमे ३४७ धावा, ३०६ धावा आणि ३०५ धावांनी पराभूत केले होते. मोठ्या फरकाने सामना जिंकणाऱ्या संघांच्या यादीत स्मृतीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सातव्या क्रमांकावर आहे. राजकोटच्या मैदानात टीम इंडियाने मिळवलेला विक्रमी विजय महिला क्रिकेट जगतातील सातवं आश्चर्य ठरतो.