IND W vs NZ W Radha Yadav Stunning Catch : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत व्यग्र आहे. या द्विपक्षीय मालिकेतील दुसरा सामना अहदमाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. दुसऱ्या वनडे सामन्यात राधा यादवनं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. या सामन्यात 'सुपर वुमन'च्या तोऱ्यात हवेत उडी मारून पकडलेला अफलातून कॅचसह तिने चाहत्यांची मनं जिंकली. पण ही मॅच मात्र मात्र न्यूझीलंडनं जिंकली.
३ सामन्यांची वनडे मालिका बरोबरीत
भारतीय संघाने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने ७६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५९ धावांनी विजय मिळवला होता.
राधा यादवचा अफलातून कॅच
न्यूझीलंड महिला संघाच्या डावातील ३२ व्या षटकात प्रिया मिश्रा गोलंदाजी करत होती. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रुक हॉलिडे हिने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण टायमिंग साधण्यात ती चुकली अन् चेंडू हवेत उडाला. राधा यादवनं उलटी धाव घेत हवेत उडी मारून कॅट पकडला. तिने घेतलेल्या अफलातून कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल माडिया अकाउंटवरुनही शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
आधी गोलंदाजी अन् मग फलंदाजीतही दिसला राधाचा जलवा
न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २५९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यात सोफी डिव्हाइनसह सूझी बेट्स, मॅडी ग्रीन आणि ली ताहूहू यांच्या विकेट्सचा समावेश होता. बॅटिंगला आल्यावर राधानं ६१ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळीही केल्याचे पाहायला मिळाले.
तिसरा अन् निर्णायक सामना कधी?
भारत आणि न्यूझीलंड महिला संघातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा देखील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे.